बुलढाणा ब्रेकिंग
“सोनम वांगचुक यांचा आवाज म्हणजे देशवासीयांचा आवाज; शिक्षणमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा” – अँड. सतीशचंद्र रोठे…
“केंद्र सरकारने उपोषणाची दखल घ्यावी; अन्यथा २० जुलैला जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल” – आझाद हिंद शेतकरी संघटना…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला देशभरातून पाठिंबा वाढत असून, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनीही आंदोलनाला जाहीर समर्थन दिले आहे. त्यांनी २० जुलै रोजी होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मागील वीस दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. त्यांच्या प्रकृतीची गंभीर स्थिती असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले असून, शरीरातील अवयवांवर परिणाम होत असल्याची माहितीही समोर आली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना अँड. सतीशचंद्र रोठे म्हणाले की, “सोनम वांगचुक यांचा आवाज म्हणजे देशवासीयांचा आवाज आहे. केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि उपोषण सन्मानपूर्वक सोडवावे.”
केंद्र सरकारने अद्याप आंदोलनाची दखल घेतलेली नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा ठपका ठेवला. देशभरातून युवक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनाच्या समर्थनासाठी पुढे येत असल्याचे सांगत, २० जुलै रोजी संसदेवर निघणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तसेच, सरकारने वेळेत निर्णय न घेतल्यास २० जुलै रोजी दिल्लीत जनआक्रोश उसळू शकतो आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची राहील, असा इशाराही अँड. रोठे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.



