28.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात नामांतर लढ्यातील सहभागींंचा गौरव — १७ वर्षांच्या ऐतिहासिक संघर्षाला उजाळा…* *बुलढाणा जिल्ह्यातील नामांतरचा लढा भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात ..*

बुलढाणा

*बुलढाण्यात नामांतर लढ्यातील सहभागींंचा गौरव — १७ वर्षांच्या ऐतिहासिक संघर्षाला उजाळा…*

*बुलढाणा जिल्ह्यातील नामांतरचा लढा भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात ..*

मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी तब्बल १७ वर्षे चाललेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या आंदोलकांचा बुलढाण्यात सत्कार धम्मगिरी बुद्ध विहार समितीच्यावतीने करण्यात आला. तसेच महार बटालियन सेवानिवृत्त सैनिकांनी शहिदांना सलामी दिली, या प्रसंगी नामांतर चळवळीतील संघर्ष, बलिदान आणि अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकलेल्या आंबेडकरी जनतेच्या ऐतिहासिक भूमिकेला उजाळा देण्यात आला…
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी सुरू झालेल्या या आंदोलनात १२ जणांनी आपले प्राण अर्पण केले. या शहीदांमध्ये बुलढाण्याच्या शाहिद प्रतिभाताई तायडे यांचा समावेश असून, त्यांच्या बलिदानाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.
नामांतर लढ्यात बुलढाणा जिल्ह्यातून डॉ. आंबेडकर नगर येथील कार्यकर्त्यांचा मोठा आणि सक्रिय सहभाग होता. तर या आंदोलनाचे नेतृत्व मलकापूर येथील भाई अशांत वानखडे यांनी केले. १९९४ मध्ये आंदोलनाने शेवटच्या टप्प्यात आक्रमक स्वरूप धारण केले होते.
डिसेंबर १९९३ मध्ये बुलढाण्यातील ५२ आंदोलकांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले. या सर्वांनी नवीन वर्षाची सुरुवात कारागृहातच केली. त्यावेळी बुलढाणा शहरात परिस्थिती चिघळल्याने संचारबंदी लागू करण्यात आली होती. शहिद प्रतिभाताई तायडे यांचे पार्थिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवल्याने वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर शहरातील शासकीय वाहनांची नासधूस झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.
या काळात राज्यातील जवळपास सर्व कारागृहे आंदोलकांनी भरून गेली होती. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना कुठे ठेवावे, हा मोठा प्रश्न तत्कालीन सरकारसमोर उभा राहिला होता.
दरम्यान, नागपूरहून प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला लाँग मार्च सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी गावाजवळील खडकपूर्णा नदीवरील सुमारे १०० फूट उंच पुलावर अडवण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूंनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि त्यानंतर लाठीचार्जचे आदेश देण्यात आले. या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलकांना अमानुष मारहाण करण्यात आली. काही आंदोलकांनी प्राण वाचवण्यासाठी पुलावरून थेट नदीत उड्या मारल्या, ज्यात अनेकजण कायमचे अपंग झाले.
अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे नामविस्तार केल्याची घोषणा केली. त्यानंतर हा १७ वर्षांचा प्रदीर्घ आणि रक्तरंजित लढा शांत झाला.
सत्कार समारंभात बोलताना उपस्थित आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिकांनी सांगितले की, हा नामांतर लढा केवळ विद्यापीठाच्या नावाचा नव्हता, तर स्वाभिमान, अस्मिता आणि सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष होता. या आंदोलनातील बलिदान, अन्याय, कारावास आणि जुलूम यांची आठवण कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या…..

Related Articles

ताज्या बातम्या