बुलढाणा
*रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त बुलढाणा बस स्थानकात भव्य जनजागृती कार्यक्रम…*
*अपघात रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेचे – उपस्थित मान्यवरांचे प्रतिपादन…*
रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त बुलढाणा बस स्थानक परिसरात जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्था आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे तसेच एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी श्रीमती शिरसाठ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बस स्थानकातील प्रवासी, वाहनचालक, एसटी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सध्या वेग, निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावणे, मद्यपान करून वाहन न चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे, वेगमर्यादा पाळणे आणि वाहतूक सिग्नलचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “रस्त्यावर वाहन चालवताना केवळ स्वतःच्या जीवाचीच नव्हे तर इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी प्रत्येक चालकाची आहे. थोडीशी चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नियम पाळणे ही सक्ती नसून गरज आहे.” असे प्रतिपादन त्यांनी केले.
बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत, रस्ता सुरक्षेबाबत सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जितेंद्र काळे यांनी सुरक्षित रस्ते, योग्य संकेतचिन्हे आणि वाहतूक नियोजन याबाबत माहिती दिली.
एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी श्रीमती शिरसाठ मॅडम यांनी एसटी चालक-वाहकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सुरक्षित व शिस्तबद्ध वाहनचालना शिवाय अपघातमुक्त प्रवास शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान प्रवाशांना व वाहनचालकांना रस्ता सुरक्षा नियमांची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली तसेच सुरक्षित वाहनचालनाबाबत प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून अपघातमुक्त बुलढाणा घडवण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.



