बुलढाणा
*बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीला लगाम; अवैध धंदे पूर्णतः बंद करण्यात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना ऐतिहासिक यश…*
बुलढाणा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. प्रथमच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णतः बंद करण्यात आले असून, त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे चित्र आमूलाग्र बदलले आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले. अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, मटका, अवैध वाहतूक, बेकायदेशीर धंदे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ठोस सूचना देत विशेष पथके स्थापन करण्यात आली.
या मोहिमेत शेकडो कारवाया करत गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर अनेक सराईत आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले. सातत्यपूर्ण गस्त, गुप्त माहितीचा प्रभावी वापर आणि त्वरित कारवाई यामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे.
या कठोर कारवाईचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व्यापारी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केले आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना किंवा गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”
बुलढाणा जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यात पोलीस प्रशासनाला मिळालेले हे यश ऐतिहासिक मानले जात आहे.



