15.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीवर तातडीची उपाययोजना करा; अन्यथा समृद्धी महामार्ग रोखू – डॉ. गोपाल बच्छीरे यांचा इशारा…*

बुलढाणा ब्रेकिंग

*लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीवर तातडीची उपाययोजना करा; अन्यथा समृद्धी महामार्ग रोखू – डॉ. गोपाल बच्छीरे यांचा इशारा…*

लोणार सरोवराची झपाट्याने वाढत असलेली पाणीपातळी, नष्ट होत चाललेली क्षारता तसेच जलमय झालेली ऐतिहासिक व धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा समृद्धी महामार्ग जाम करण्यासह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे व लोणार येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत मुख्य वनरक्षक (वन्यजीव विभाग), केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री, प्रधानमंत्री, डायरेक्टर जनरल – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) दिल्ली तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर, फ्रान्स यांना निवेदन व ई-मेलद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

*जागतिक वारसा धोक्यात…*

लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे उल्कापातातून निर्माण झालेले भू-वैज्ञानिक आश्चर्य आहे. मात्र सध्या सरोवराची पाणीपातळी २० ते २५ फूटांनी वाढल्याने त्याचे मूळ स्वरूप धोक्यात आले आहे. सरोवराच्या पाण्याचा pH स्तर ११.५ वरून ७.५ पर्यंत खाली आला असून, क्षारता (TDS) ६००० वरून ४०० पर्यंत घसरली आहे.
या बदलांमुळे येथील दुर्मिळ जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असून, सध्या सरोवरात मासे आढळून येत आहेत. भविष्यात जैविक असंतुलनामुळे धोकादायक सजीव तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जैवविविधता संपुष्टात आली तर हे सरोवर सामान्य तलावात रूपांतरित होईल, परिणामी पर्यटन ठप्प होऊन लोणार शहराच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा डॉ. बच्छीरे यांनी दिला..

*ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना धोका…*

पाणीपातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर, सोळाव्या शतकातील गैबनशहा वली यांची दर्गा तसेच इतर अनेक प्राचीन मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. गर्भगृहात पाणी शिरल्याने देवीच्या मूर्तींसह मंदिरांच्या रचनेला हानी पोहोचत असून, यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

*सांडपाणी व गोड्या पाण्यामुळे मूळ स्वरूप नष्ट…*

लोणार शहरातील सांडपाणी तसेच गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ रासायनिक व नैसर्गिक स्वरूप बदलत आहे. त्यामुळे धारतीर्थ, रामगया यांसारखे नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्त्रोत सरोवराच्या काठावरच अडवून, उपसा सिंचन (वॉटर लिफ्टिंग) पद्धतीने ते पाणी लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तातडीने कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

*मास्टर प्लॅनची मागणी…*

पुरातत्त्व विभाग (ASI), वन्यजीव विभाग व महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीचे नियोजन करावे. सरोवराच्या सद्यस्थितीचा इम्पॅक्ट रिपोर्ट व उपाययोजना (मास्टर प्लॅन) तयार करून तो लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव) शैलेंद्र डेहरवाल, ASI दिल्लीचे महासंचालक यदुबीर सिंह रावत, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटरचे महासंचालक खालिद अल एनानी यांना सादर करण्यात आला आहे.

*१५ दिवसांचा अल्टिमेटम…*

येत्या १५ दिवसांत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास, प्राचीन, धार्मिक व पर्यावरणीय वारसा वाचवण्यासाठी संवैधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग जाम, धरणे, जलसमाधी यांसारखी आंदोलने करण्यात येतील, असा ठाम इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक, राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्त्व अभ्यासक डॉ. गोपाल बच्छीरे, शहर प्रमुख गजानन जाधव व ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी सुदन अंभोरे, विनायक मापारी, श्रीकांत मादनकर, इकबाल कुरेशी, ओवेस कुरेशी, अशपाक खान, फहीम खान, योगेश भुक्कन, ज्ञानेश्वर दुधमोगरे, सादिक शेख, विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या