बुलढाण्यात पिक विमा प्रश्न पेटला; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
२९ एप्रिलला आमरण उपोषण, १ मे रोजी काळीगुडी उभारून निषेध — शेतकरी योद्धा कृती समितीचा इशारा
बुलढाणा
जिल्ह्यातील पिक विमा प्रश्न चांगलाच पेटला असून शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांनी दिला आहे. यासंदर्भात आज पंचायत समिती सभागृह, सिंदखेडराजा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत खरीप २०२५ हंगामातील परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जवळपास १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असतानाही, पिक विमा कंपनी व कृषी विभागाकडून नुकसान न झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना विमा नाकारला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. तसेच, या अन्यायकारक भूमिकेविरोधात २९ एप्रिल रोजी अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
याचबरोबर, १ मे महाराष्ट्र दिनी काळीगुडी उभारून सरकार व पिक विमा व्यवस्थेचा निषेध नोंदविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, यासाठी शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी थेट चर्चा करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
दरम्यान, शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करत विविध स्वरूपात पुढे नेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांनी तातडीने चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून या लढ्यात सहभागी व्हावे, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
— शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा



