बुलढाणा ब्रेकिंग
*“देशावर नाही, तर थेट शेतकऱ्यांवर संकट”; डिझेल टंचाईवर शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा..*
*“डिझेल द्या, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल”; विनायक सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा…*
जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून शेती मशागतीची कामे पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत. पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या तब्बल 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “नेते म्हणत आहेत की देशावर संकट आहे, मात्र प्रत्यक्षात हे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे,” असे सांगत सरनाईक यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची महत्त्वाची वेळ असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर, मशागतीची यंत्रे आणि शेतीची कामे ठप्प पडली असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच शेतकरी रांगेत उभे राहत असून डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल पुरवठा करावा, अन्यथा राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देखील सरनाईक यांनी दिला. “उद्याच्या काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.



