बुलढाणा ब्रेकिंग
कडक उन्हात बुलढाणा शहर तहानले; आठ दिवसांनी अवघा एक तास पाणीपुरवठा…
“दोन दिवसाआड पाणी”चा दावा फोल; नागरिकांची आ. संजय गायकवाड यांच्याकडे धाव….
कडक उन्हामुळे आधीच त्रस्त असलेल्या बुलढाणा शहरातील नागरिकांना आता भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात तब्बल आठ दिवसांनंतर केवळ एक तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती वापरासाठी पाणी मिळत नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
बुलढाणा शहराला येळगाव धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या अपुरा दाब, विस्कळीत नियोजन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. नगरपालिकेकडून “दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल” असा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात हा दावा पूर्णपणे फोल ठरल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून काही ठिकाणी विहिरी व बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी दैनंदिन कामांवर परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने लक्ष द्यावे आणि नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून बुलढाणेकरांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



