- बुलढाणा ब्रेकिंग
*बुलढाणा शहरासह जिल्ह्यात रस्त्यावर विकले जातेय ‘विषारी अन्न’ ?;…*
*अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप…*
*हातगाड्यांवरील उघड्या खाद्यपदार्थांची बिनधास्त विक्री…*
*नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबविण्यासाठी कठोर कारवाईची मागणी..*
बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाणीपुरी, वडापाव, पोहे, कचोरी, सामोसे, पावभाजी, आईस्क्रीम, कुल्फी तसेच विविध फळांची विक्री करणाऱ्या हातगाड्या शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र या विक्रीवर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बुलढाणा शहरातील चिंचोले चौक परिसरासह अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. धूळ, प्रदूषण, माशा आणि अस्वच्छ वातावरणात विकल्या जाणाऱ्या या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची, पाण्याची किंवा इतर साहित्याची नियमित तपासणी होत नसल्याचा आरोपही होत आहे. जिल्हा मुख्यालयात बसस्थानकासमोर अन्न व औषध प्रशासनाची भव्य इमारत असताना, त्याच परिसरात अनेक हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे वास्तव नागरिकांना खटकत आहे. संबंधित विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत का, अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का, याबाबत प्रशासनाकडून प्रभावी तपासणी होत नसल्याची चर्चा आहे. भेसळयुक्त खाद्यतेल, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि अस्वच्छ पद्धतीने तयार होणाऱ्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांची विशेष मोहीम राबवून तपासणी करण्यात यावी, परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, खाद्यतेल व खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी मागणी बुलढाणेकरांनी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुखांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशीही मागणी पुढे येत आहे.



