21 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

फसव्या कर्जमाफीचा संताप अनावर; मलकापुरात शेतकऱ्यांनी स्वतःची सिंचन साधने पेटवली!…. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला वाघूळकरांचा जाहीर पाठिंबा

बुलढाणा ब्रेकिंग

फसव्या कर्जमाफीचा संताप अनावर; मलकापुरात शेतकऱ्यांनी स्वतःची सिंचन साधने पेटवली!….

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला वाघूळकरांचा जाहीर पाठिंबा; सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश….

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप करत मलकापूर तालुक्यातील वाघूळ येथील शेतकऱ्यांनी बुधवारी तीव्र आंदोलन छेडले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून उभारलेले सिंचन साहित्य पेटवून देत संताप व्यक्त केला. या अभूतपूर्व आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सरकारविरोधातील शेतकऱ्यांचा रोष पुन्हा एकदा समोर आला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा १२ तासांवरून थेट ६ तासांवर आणण्यात आल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य होत आहे. आधीच पावसाअभावी शेतकरी संकटात असताना सरकारच्या या निर्णयामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी हाताशी आलेली पिके वाळून जात असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
कर्जमाफीच्या नावाखाली केवळ घोषणा केल्या जात असून प्रत्यक्षात सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाढते उत्पादन खर्च, बियाणे, खते, औषधे आणि वीज यांचे वाढलेले दर यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच बळीराजा कर्जाच्या विळख्यात अडकला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाघूळ येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केल्याचे स्पष्ट केले. “ज्या सिंचन साहित्याच्या बळावर आम्ही पिके जगवतो, तेच साहित्य आज संतापाच्या भरात जाळण्याची वेळ आमच्यावर आली आहे,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी शेतकरी नेते हनुमान भगत यांनी सरकारवर जोरदार टीका करत सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. कर्जमाफी केवळ कागदावर आहे, वीज कपातीमुळे पिके वाळत आहेत आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफीचा ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
या आंदोलनात ॲड. गोपाल रायपुरे पाटील, बाळुभाऊ ठाकरे, सुनील संभारे, चेतन हिवरखेडे यांच्यासह वाघूळ गावातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या