बुलढाणा ब्रेकिंग
*एसपी डॉ. निलेश तांबेंचे ‘मिशन परिवर्तन’ आता महाराष्ट्रभर?; विविध सामाजिक संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…*
*बुलढाण्यातील व्यसनमुक्ती आणि अवैध धंदेविरोधी पॅटर्नची राज्यभर चर्चा; ‘मिशन परिवर्तन’ला जनसमर्थन…*
जिल्ह्यात अवैध धंदे, व्यसनाधीनता आणि गावगुंडांविरोधात धडक कारवाई करत जनतेत वेगळी ओळख निर्माण करणारे पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदन आणि ई-मेलद्वारे ही मागणी केली आहे.
वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष हभप विलास महाराज वाघमारे, सन्मान स्वतंत्र कामगार संघटनेचे संस्थापक शेख युनूस, ग्राम स्वराज्य समितीचे योगेश कोकाटे, आझाद हिंदचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, तालुका उपाध्यक्ष अशोक बाहेकर, रमाई ब्रिगेडच्या पंचफुलाबाई गवई, किसान ब्रिगेडचे सिद्धार्थ वानखेडे, मातृतीर्थ रणरागिनी संघटनेच्या भारती अवचार, महानायक विचारमंचचे गणेश पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत शासनाकडे मागणी नोंदवली आहे.
जिल्ह्यात प्रथमच विविध सामाजिक संघटना एकत्र येत एखाद्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीचा गौरव करत राज्यस्तरावर पॅटर्न लागू करण्याची मागणी करत असल्याने या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, भूतपूर्व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करत आझाद हिंद महिला संघटनेने त्यावेळी पोलीस अधीक्षकांची गाडी अडवून आंदोलन केले होते. त्यानंतर विश्व पानसरे यांची बदली झाली आणि डॉ. निलेश तांबे यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. तांबे यांनी ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत व्यसनमुक्त आणि अवैध व्यवसायमुक्त जिल्हा घडविण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती, पथनाट्यांच्या माध्यमातून प्रबोधन, विशेष पोलिस पथकांची निर्मिती, शिक्षक आणि पालकांशी संवाद, गुटखा विक्रीविरोधात कारवाई, तसेच निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर नियंत्रण अशा अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील वातावरणात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा विविध संघटनांनी केला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही डॉ. निलेश तांबे यांची “कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक” अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.
यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महसूल विभागातील प्रलंबित दस्तऐवजांची प्रक्रिया सुलभ करत ‘मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न’ राबविला होता. त्या पद्धतीला राज्यभर मान्यता मिळाली होती. त्यावेळीही बुलढाण्यातील सामाजिक संघटनांनीच तो पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी केली होती. आता त्याच धर्तीवर डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ राज्यभर लागू होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



