*मतदार यादी पुनरीक्षणासाठी बीएलओंना सहकार्य करा; प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत असणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे*
बुलढाणा,
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांच्या तपशीलाची पडताळणी करणार आहेत. यावेळी मतदारांनी आपले नाव, पत्ता, वय तसेच अन्य माहितीची खातरजमा करून घ्यावी. तपशीलात काही दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असल्यास त्यासाठी उपलब्ध अर्ज भरून आवश्यक प्रक्रिया जागेवरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित अर्जावर कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेतली जाईल.
पहिल्या भेटीदरम्यान नागरिक घरी उपलब्ध नसल्यास बीएलओ पुन्हा संपर्क साधून दुसऱ्यांदा भेट देतील. त्यानंतरही आवश्यक असल्यास तिसऱ्यांदा भेट देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. मात्र या तीन भेटींपैकी किमान एका भेटीदरम्यान कुटुंबातील एक जबाबदार सदस्य अथवा कुटुंबप्रमुख उपस्थित राहून आवश्यक माहिती व कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेला गांभीर्याने घ्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मतदारांना माहिती भरण्यास किंवा अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास बीएलओ आवश्यक मार्गदर्शन करतील. तसेच बूथ लेव्हल एजंट (बीएलए) आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही या मोहिमेत नागरिकांना सहकार्य करणार आहेत.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. प्रारूप यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित ठिकाणी अर्ज क्रमांक ६, ७ किंवा ८ भरून दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहनही डॉ. देवरे यांनी केले आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत महत्त्वाचे असून, बीएलओ घरी भेट देतील तेव्हा त्यांना आवश्यक सहकार्य करून ही प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना केले आहे.



