29.2 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

*”अशोक दाभाडे म्हणजे आंबेडकरी चळवळीचा जिवंत झरा;” संघर्ष, आंदोलन आणि न्यायासाठी आयुष्य झोकून देणारे व्यक्तिमत्व..!*

*”बुलढाण्यातील एक संघर्षमय व्यक्तिमत्व…”*

*”अशोक दाभाडे म्हणजे आंबेडकरी चळवळीचा जिवंत झरा;” संघर्ष, आंदोलन आणि न्यायासाठी आयुष्य झोकून देणारे व्यक्तिमत्व..!*

*पळसोडा ते बुलढाणा… संघर्षातून घडलेला लढवय्या चेहरा; अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरलेला समाजाचा आधारवड..!*

आजच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या काळात अनेक जण चळवळीच्या नावाने पुढे येतात, मात्र प्रत्यक्ष अन्यायग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व फार कमी दिसते. बुलढाणा जिल्ह्यातील अशाच संघर्षमय, आक्रमक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे अशोक दाभाडे. त्यामुळेच त्यांना आज “आंबेडकरी चळवळीचा जिवंत झरा” म्हणून संबोधले जाते.
शेगाव तालुक्यातील पळसोडा या ग्रामीण भागातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपला जीवनप्रवास सुरू केला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही संघर्षाला शस्त्र मानत त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. अनेक अडीअडचणींवर मात करत बुलढाणा येथे येऊन तांत्रिक शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण मातीतून उभा राहिलेला हा युवक पुढे आपल्या जिद्द, मेहनत आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर समाजात वेगळी ओळख निर्माण करेल, याची कल्पनाही त्यावेळी कुणाला नव्हती.
त्यानंतर त्यांनी एस.टी. महामंडळाच्या तांत्रिक विभागात तब्बल ३० वर्ष सेवा बजावली. मात्र ही नोकरी केवळ उपजीविकेचे साधन न राहता कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष बनली. कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल, प्रशासनाकडून त्रास दिला जात असेल तर अशोक दाभाडे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघटनात्मक ताकद उभी केली. विविध कर्मचारी संघटनांचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
त्यांच्या कार्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे अन्यायाविरोधातील रस्त्यावरचा लढा. कुठे अत्याचार झाला, कुणावर अन्याय झाला, समाजातील वंचित घटकांवर दडपशाही झाली तर अशोक दाभाडे हे शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांनी असंख्य आंदोलने केली, मोर्चे काढले आणि प्रशासनाला धारेवर धरत न्यायासाठी लढा दिला. त्यांच्या आंदोलनाची धार आजही कायम असल्याचे चित्र दिसून येते.
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुंबई येथे जाऊन बैठका घेतल्या. शासन दरबारी आवाज पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे कर्मचारी वर्गातही त्यांच्याबद्दल मोठा विश्वास आणि आदर निर्माण झाला.
वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकजण सार्वजनिक जीवनापासून दूर जातात. मात्र अशोक दाभाडे यांनी निवृत्तीनंतर सामाजिक कार्यालाच आयुष्य समर्पित केले. सध्या ते भाई अशांत वानखेडे यांच्या “समतेचे निळे वादळ” संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून ते जिल्ह्यातील अन्यायग्रस्त, वंचित आणि पीडित समाजघटकांच्या प्रश्नासाठी सतत झटताना दिसतात.
जिल्ह्यात कुठेही समाजावर अन्याय-अत्याचाराची घटना घडली की अशोक दाभाडे तातडीने त्या ठिकाणी पोहोचतात. पीडितांना मानसिक आधार देत प्रशासनाकडे न्यायाची मागणी करतात. त्यामुळे सामाजिक चळवळीत त्यांच्याबद्दल एक वेगळी विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
आजच्या स्वार्थी राजकारणाच्या आणि दिखाऊ सामाजिक कार्याच्या युगात अशोक दाभाडे हे संघर्ष, सामाजिक बांधिलकी आणि आंबेडकरी विचारांची जाज्वल्य परंपरा जपणारे नाव म्हणून पुढे येत आहेत. म्हणूनच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव त्यांना “चळवळीचा जिवंत झरा” असे संबोधतात, आणि ते अतिशयोक्ती ठरत नाही, एवढे मात्र निश्चित.

Related Articles

ताज्या बातम्या