बुलढाणा ब्रेकिंग
पाडळीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यातील 6 शेळ्या ठार…
दीड लाखांचे नुकसान; बिबट पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी गावात बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वन्यप्राणी बिबट्याने गावात शिरून एका गोठ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या सहा शेळ्या जागीच ठार झाल्या असून एक बोकड बिबट्याने ओढून नेल्याची घटना घडली.
या घटनेत शेतकरी रमेश बाबुराव सोनुने यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बिबट्याच्या वावरामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता तात्काळ पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.
याबाबत शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड, शिवाजी डुकरे, वसंता पवार, रविंद्र पवार, हर्षल मुळे तसेच ग्रामस्थांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. वनविभागाने त्वरित कारवाई केली नाही, तर भविष्यात नागरिकांवर किंवा जनावरांवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पाडळी परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्याने शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच एकट्याने शेतात किंवा जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. आता वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी कोणती पावले उचलतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



