बुलढाणा
*बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी करत शिवसेनेचा इशारा..*
*शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन; संबंधित कंपनीवर तातडीने कारवाईची मागणी..*
शेगाव तालुक्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुका कृषी अधिकारी, शेगाव यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०२६ च्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी ‘रवी उन्नती’ कंपनीसह इतर कंपन्यांचे बियाणे वापरले. मात्र हे बियाणे बोगस अथवा निकृष्ट दर्जाचे निघाल्याने उगवण कमी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या मागणीमुळे शेगाव तालुक्यातील बियाण्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कृषी विभाग काय भूमिका घेतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



