23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

चिखलीतील सोमठाणा जि.प. शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या; सुट्टीमुळे मोठी दुर्घटना टळली*

बुलढाणा ब्रेकिंग

*चिखलीतील सोमठाणा जि.प. शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या; सुट्टीमुळे मोठी दुर्घटना टळली*

*दोन वर्षांपासून तक्रारी करूनही प्रशासन झोपेत; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाल्याने ग्रामस्थ संतप्त*

मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारत कोसळली; नवीन शाळा इमारतीची ग्रामस्थांची तातडीची मागणी

शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे दावे करणाऱ्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक नमुना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर शाळेची दयनीय अवस्था समोर आली असून भिंती कोसळलेल्या, छताचे पत्रे आणि स्लॅब खाली पडलेले, तसेच वर्गखोल्यांमध्ये विटा-मातीचा ढिगारा साचलेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही शाळा गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. २०२४ पासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गट शिक्षणाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देण्यात आली. परिणामी अखेर मुसळधार पावसात शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. संतप्त पालक आणि ग्रामस्थांशी चर्चा करून शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीचे तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी सोमठाणा येथील विद्यार्थ्यांसाठी तातडीने नवीन शाळा इमारत मंजूर करावी, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रश्न मात्र कायम आहे की, दोन वर्षांपासून तक्रारी होत असतानाही प्रशासनाने वेळेत दखल का घेतली नाही? एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता सोमठाणा ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या