33.2 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

*७५ वर्षांनंतरही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नाही; विधानसभेत आमदार सिद्धार्थ खरात यांचा संतप्त सवाल..*

बुलढाणा ब्रेकिंग

*७५ वर्षांनंतरही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नाही; विधानसभेत आमदार सिद्धार्थ खरात यांचा संतप्त सवाल..*

*”आधी स्मशानभूमी, मग विकासकामे”; जागा नसलेल्या गावांसाठी जमीन अधिग्रहित करून तातडीने निधी देण्याची सरकारकडे मागणी..*

स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही राज्यातील अनेक गावांमध्ये आजपर्यंत स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. ग्रामीण भागातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
आमदार खरात यांनी विधानसभेत सांगितले की, स्मशानभूमी नसल्यामुळे अनेक गावांतील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी दूरवर जावे लागते. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते. एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासासाठीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही शासन व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही अशा गावांमध्ये प्रथम स्मशानभूमीची उभारणी करूनच इतर विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी भूमिका शासनाने घेतल्याची माहिती आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मात्र, केवळ निर्णय घेऊन चालणार नाही, तर ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नाही, त्या गावांसाठी शासनाने दोन ते तीन गुंठे जमीन अधिग्रहित करून तातडीने निधी मंजूर करावा, अशी ठाम मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या मागणीची शासनाने सकारात्मक दखल घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
“स्मशानभूमी हा केवळ विकासाचा विषय नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाने जगण्याचा आणि अखेरच्या प्रवासाचाही मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे राज्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी शासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत,” असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या