बुलढाणा ब्रेकिंग
*सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडले; लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा समतेचे निळे वादळ संघटनेकडून जाहीर निषेध..*
*‘उपोषणकर्त्याला फरफटत नेणे ही हुकूमशाहीची परिसीमा’; भाई अशांत वानखेडे यांचा केंद्र सरकारवर घणाघात..*
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेले आंदोलन दडपण्याची केंद्र सरकारची भूमिका लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर घाला घालणारी असल्याचा आरोप करत समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेने सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांनी मागील २० दिवसांपासून लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले होते.
नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते.
मात्र, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत दडपण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने फरफटत उचलून नेण्याची घटना ही लोकशाहीला काळिमा फासणारी असून, शांततापूर्ण आंदोलनाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले.
सरकारची ही भूमिका लोकशाहीवादी नसून हुकूमशाही आणि दडपशाहीची असल्याचा घणाघात करत, समतेचे निळे वादळ संघटनेच्या वतीने या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेत आंदोलनकर्त्यांचा आवाज ऐकून न्याय देणे अपेक्षित असताना दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीकाही भाई अशांत वानखेडे यांनी केली.



