बुलढाणा
*सिन्नरमध्ये विधवा महिलेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; कुंभार समाज विकास परिषदेकडून कठोर कारवाईची मागणी*
*१३ वर्षीय मुलीवरील अत्याचारानंतर धमक्यांचा आरोप; संगीता जाधव हत्या प्रकरणात संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..*
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील घोडी गावातील ५० वर्षीय विधवा महिला संगीता मधुकर जाधव यांच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी संगीता जाधव यांचा हातपाय बांधून गळ्याला फास लावून विहिरीत टाकून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप सकल कुंभार समाज विकास परिषदेने केला आहे.
परिषदेकडून खामगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, घटनेच्या काही दिवसांपूर्वी संगीता जाधव यांच्या १३ वर्षीय नातीवर घोडी गावातील काही नराधमांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
मात्र, त्यानंतर पीडित कुटुंबावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गावातील सरपंच व पोलीस पाटील यांनी पीडित कुटुंबाला “तीन लाख रुपये देतो, केस मागे घ्या, नाहीतर तुम्हाला बरे-वाईट करायला आम्हाला वेळ लागणार नाही,” अशा धमक्या दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
संगीता जाधव यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडल्याने संशयित आरोपींनी त्यांची हातपाय बांधून गळ्याला फास लावून विहिरीत टाकून हत्या केल्याचा आरोप कुंभार समाज विकास परिषदेने केला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याचे परिषदेकडून नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून पॉक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संगीता मधुकर जाधव यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून घोडी गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह सर्व संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडित कुटुंबातील सुरज मधुकर जाधव व किरण मधुकर जाधव यांना तातडीने पोलीस संरक्षण आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
सकल कुंभार समाज विकास परिषदेचे अध्यक्ष संजय गाते, उपाध्यक्ष चंदनलाल प्रजापती आणि सरचिटणीस सुभाष टेटेकर यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने २४ तासांच्या आत कठोर कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील कुंभार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, निवेदनातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. संबंधित तपास यंत्रणेकडून या प्रकरणात काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



