ग्रामीण आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य विभागाचा कृतिबंध आराखडा
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांचे प्रभावी नियोजन

बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, वेळेवर व परवडणारी आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सखोल व दूरदृष्टीपूर्ण नियोजन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये सक्षम करण्यात आली असून ग्रामीण आरोग्य सेवेचा कृतिबंध आराखडा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या आराखड्याअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, औषधसाठा, तपासणी उपकरणे व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गावातच उपचार मिळावेत, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे.

सर्व सुविधा एका छताखाली
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मातृ व बाल संगोपन सेवा, लसीकरण, रक्तदाब व मधुमेह तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचे निदान व उपचार, तसेच औषधांचा मोफत पुरवठा केला जात आहे. गर्भवती महिलांची नियमित तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, पोषण आहार सल्ला आणि बालकांचे वाढ निरीक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे.
आपत्कालीन सेवाही सज्ज
ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा सक्षम ठेवण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती किंवा आकस्मिक परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
आरोग्य जनजागृतीवर भर
आरोग्य सेवेसोबतच जनजागृतीवरही मोठा भर देण्यात येत आहे. गावपातळीवर आरोग्य शिबिरे, तपासणी मोहीम, व्यसनमुक्ती, स्वच्छता, पोषण व जीवनशैली विषयक मार्गदर्शन कार्यक्रम राबवले जात आहेत. आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराघरात आरोग्य संदेश पोहोचवला जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य मजबूत ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे. प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.”



