बुलढाणा ब्रेकिंग
*पेंच अभयारण्यातून 35 महिन्यांचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल*….
*PKT7CP1 नावाचा वाघ नव्या अधिवासात — महामार्गावर वाहनधारकांसाठी कडक नियम..*

बुलढाणा
मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून 35 महिन्यांचा वाघ बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वीपणे स्थलांतरित करण्यात आला असून त्याला PKT7CP1 असे नाव देण्यात आले आहे. या वाघाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्याच्या जैवविविधतेत भर पडली असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही मोठी सकारात्मक घटना मानली जात आहे….वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञ पथकाच्या देखरेखीखाली हा स्थलांतर प्रकल्प पूर्ण करण्यात आला. वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात असून त्याचे आरोग्य व वर्तन सुरक्षित असल्याची माहिती वन्यजीव अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा–खामगाव महामार्गावर वाहनधारकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश वन्यजीव विभागाने दिले आहेत. वाघासह इतर वन्यप्राणी रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने वेगमर्यादा काटेकोरपणे पाळणे, अनावश्यक हॉर्न वाजवू नये, रात्री वाहनाचा वेग कमी ठेवावा तसेच थांबून फोटो काढणे टाळावे, अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.
वन्यजीव विभागाने इशारा दिला आहे की नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल. या परिसरात सीसीटीव्ही, पेट्रोलिंग व गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण हे विभागाचे प्राधान्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले….स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत उत्सुकता असून ज्ञानगंगा अभयारण्याच्या पर्यटन आणि पर्यावरणीय महत्त्वात यामुळे वाढ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र नागरिकांनी आणि प्रवाशांनी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे वन विभागाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे….



