बुलढाणा
*बुलढाणा आगारातून बंद झालेल्या बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी; नागरिकांच्या सोयीसाठी नव्या मार्गांचाही प्रस्ताव…*
*भाजपच्या वतीने विभागीय नियंत्रकांना दिले निवेदन…*
बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी बंद पडलेल्या बससेवा पुन्हा सुरू कराव्यात तसेच काही नवीन बसमार्ग सुरू करावेत, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस किरण नाईक यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांच्या वाढत्या मागण्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढत असल्याने ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे…
या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा आगारातून अनेक प्रवासी दररोज विविध शहरांमध्ये प्रवास करतात. मात्र काही महत्त्वाच्या बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः व्यापारी, विद्यार्थी आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
पूर्वी मलकापूर ते चिखली दरम्यान सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या वेळेनुसार बससेवा चालत होती. या बससेवेचा नागरिकांना मोठा फायदा होत होता. मात्र काही कारणास्तव ही सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून ही सेवा कायमस्वरूपी पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात खालील बसमार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे –
बुलढाणा – नंदुरबार / शिरपूर (भुसावळ, चाळीसगाव मार्गे) – सकाळी जाणे-येणे
जळगाव जामोद – शिर्डी (बुलढाणा, सिल्लोड, वैजापूर किंवा गंगापूर मार्गे) – मुक्कामी
बुलढाणा – रावेर (सावदा, फैजपूर मार्गे) – सकाळी जाणे-येणे
बुलढाणा – अक्कलकोट – मुक्कामी
मेहकर – सुरत (चिखली, बुलढाणा, भुसावळ, जळगाव, धुळे मार्गे) – रातराणी
मलकापूर – चिखली (सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वे प्रवाशांसाठी) –
कायमस्वरूपी सेवा नागरिकांच्या सोयीचा विचार करून या बससेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात आणि यासंदर्भात आठ दिवसांत कारवाईची माहिती द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत राज्याचे परिवहन मंत्री, बुलढाणा आगार व्यवस्थापक, मेहकर आगार व्यवस्थापक तसेच जळगाव जामोद आगार व्यवस्थापक यांनाही देण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी या बससेवा अत्यंत महत्त्वाच्या असल्याने प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



