बुलढाणा ब्रेकिंग
*अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांच्या ‘सिबिल’चे संरक्षण करा..*
*मृत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तातडीने मार्गदर्शक सूचना जारी करा; प्रेमलता सोनोने यांची मागणी*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताना कोणताही त्रास होऊ नये, तसेच त्यांच्या पतक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांनी मलकापूर शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा व्यवस्थापकांशी सकारात्मक चर्चा केली. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, बँकांची भूमिका आणि शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला, तरी पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळताना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, अशी भूमिका सोनोने यांनी मांडली. विशेषतः कर्जमाफीची प्रक्रिया ‘वन टाइम सेटलमेंट’ (OTS) पद्धतीने झाल्यास शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा त्यांनी बँक व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिला. सिबिल स्कोअर खराब झाल्यास भविष्यात शेती, सिंचन, शिक्षण किंवा इतर गरजांसाठी कर्ज घेताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कर्जमाफीची नोंद अशा पद्धतीने करण्यात यावी की, शेतकऱ्यांच्या भविष्यातील कर्जक्षमतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मृत शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्जमाफीबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नसल्याची माहिती बँकांकडून देण्यात आली. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये संभ्रम निर्माण होत असून शासनाने मृत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तातडीने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी प्रेमलता सोनोने यांनी केली.
शेतकऱ्यांशी बँकांनी संवेदनशीलतेने वागावे, अनावश्यक कागदपत्रांची मागणी, विलंब किंवा त्रास टाळून कर्जमाफीची प्रक्रिया सुलभ करावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. एकूणच ही बैठक तक्रारींपेक्षा उपाययोजनांवर केंद्रित राहिली. शासन, बँका आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढवून कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शक, सुलभ आणि न्याय्य पद्धतीने पोहोचविण्याचे आवाहन प्रेमलता सोनोने यांनी केले.



