*मोताळ्यात उमलले दुर्मिळ भूचर ऑर्किड.संवर्धनासाठी आशेची नवी पालवी.*
बुलढाणा(प्रतिनिधी)
मोताळा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या उद्यानात दुर्मिळ प्रकारातील आर्किड फुल नुकतेच उमलले आहे.निसर्गाच्या ह्या सुंदर नजराण्याविषयी जाणून घेऊ या … पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपल्या रंगांची उधळण करतो. याच काळात अनेक दुर्मिळ वनस्पती आपले अल्पकाळ टिकणारे सौंदर्य प्रकट करतात. अशाच एका दुर्मिळ भूचर ऑर्किड जिओडोरूम लॅक्सीफ्लोरम ला मोताळा येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानात फुले आली आहेत. ही घटना केवळ सौंदर्याचा आनंद देणारी नसून वनस्पती संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
ऑर्किड कुळ हे जगातील सर्वात मोठ्या पुष्पीय वनस्पती कुलांपैकी एक असून, जगभरात सुमारे २८,००० हून अधिक प्रजाती आढळतात. भारतात जवळपास १,३००–१,४०० प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी अनेक प्रजाती अतिशय विशिष्ट अधिवासावर अवलंबून असल्यामुळे हवामान बदल, जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे यामुळे धोक्यात आहेत.
‘जिओडोरूम लॅक्सीफ्लोरम’ ही झाडांवर वाढणारी ऑर्किड नसून जमिनीमध्ये कंदाच्या साहाय्याने वाढणारी भूचर ऑर्किड आहे. तिचा फुलोरा सुरुवातीला खाली झुकलेला असतो आणि नंतर हळूहळू सरळ उभा राहतो. मधमाश्यांद्वारे परागीभवन होणारी ही वनस्पती ओलसर पानझडी, अर्धसदाहरित व गवताळ जंगलांमध्ये आढळते. भारतासह दक्षिण आणि आग्नेय आशियात तिचा प्रसार असला तरी नैसर्गिक अधिवास झपाट्याने कमी होत असल्याने अनेक भागांत ती दुर्मिळ होत चालली आहे. काही भारतीय संशोधनांमध्ये तिला संकटग्रस्त मानून कृत्रिम बीजतंत्र आणि ऊतकसंवर्धना द्वारे संवर्धनाचे प्रयत्न करण्यात आले आहेत.अशा दुर्मिळ वनस्पतींचे जतन करण्यासाठी वनस्पती उद्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. नैसर्गिक अधिवासाबाहेर त्यांचे संगोपन केल्यामुळे संशोधन, शिक्षण, जनजागृती आणि भविष्यातील पुनर्स्थापनेसाठी मौल्यवान जनुकसंपदा सुरक्षित राहते.
यासाठी श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा येथील प्राचार्य, वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रवीण ठेंग व सहकारी, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. दुर्मिळ स्थानिक वनस्पतींचे संवर्धन, त्यांचे दस्तऐवजीकरण आणि समाजापर्यंत त्यांचे महत्त्व पोहोचविण्याचे हे कार्य नक्कीच प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधतेबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होतो आणि स्थानिक जैवसंपदेच्या संरक्षणासाठी समाजात सकारात्मक वातावरण तयार होते.
आज गरज आहे अशा दुर्लक्षित वनस्पतींच्या संवर्धनाची.कारण प्रत्येक दुर्मिळ वनस्पती ही परिसंस्थेतील अन्नसाखळी, परागीभवन, सूक्ष्मजीव आणि इतर जीवसृष्टीशी निगडित असते. एक ऑर्किड वाचवणे म्हणजे एका संपूर्ण परिसंस्थेचे भविष्य जपणे होय.
दुर्मिळ फुले उमलणे ही केवळ निसर्गाची कलाकृती नसून संवर्धनाच्या योग्य दिशेने होत असलेल्या प्रयत्नांची साक्ष आहे. अशी प्रत्येक नोंद संशोधकांसाठी महत्त्वाची, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि समाजासाठी निसर्गसंवर्धनाचा आशादायी संदेश देणारी आहे.
*अजिंक्य वि. देशमुख,*
फील्ड बायोलॉजिस्ट,
कान्हा टाइगर रिजर्व (म.प्र )



