बुलढाणा
*बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावणारी कामगिरी कु. आकांक्षा संजय कदम ‘प्रतिष्ठित फॉरएव्हर मिस टीन बुलढाणा २०२५’…*

बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी कामगिरी करत कु. आकांक्षा संजय कदम हिने ‘फॉरएव्हर मिस टीन बुलढाणा’ हा मानाचा किताब पटकावला आहे. जिल्ह्यातून मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकत ती बुलढाणा जिल्ह्यातील पहिली ‘मिस टीन’ मॉडेल ठरली आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा फॉरएव्हर स्टार इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यातआली होती. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जयपूर येथील जी स्टुडिओमध्ये १९ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये कु. आकांक्षा हिने आपले वेगळेपण सिद्ध केले.
या स्पर्धेत विविध टप्प्यांमधून सहभागींना आपले कौशल्य, संवादशैली, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक जाणीव सादर करण्याची संधी देण्यात आली होती. प्रत्येक फेरीत आकांक्षा हिने आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिचा सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व हे तिच्या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

कु. आकांक्षा संजय कदम हिचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या या यशामुळे अनेक तरुणींना स्वप्ने पाहण्याची व ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळणार आहे. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनत केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.
या यशाबद्दल आकांक्षा हिच्यावर कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करून समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची तिची इच्छा आहे.
‘फॉरएव्हर मिस टीन बुलढाणा’ हा किताब जिंकून कु. आकांक्षा संजय कदम हिने बुलढाण्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. ती आपल्या यशाचे श्रेय वडील पी. एस. आय. संजय उत्तमराव कदम, आई सौ. मिना संजय कदम, भाऊ आनंद कदम व बहीण समीक्षा कदम यांना देते.



