19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

मक्याचे विक्रमी उत्पादन, पण खरेदी ठप्प!” – उद्दिष्ट वाढवून नाफेड केंद्रे त्वरित सुरू करा; ॲड. जयश्री शेळके यांची सरकारकडे मागणी…

मक्याचे विक्रमी उत्पादन, पण खरेदी ठप्प!” – उद्दिष्ट वाढवून नाफेड केंद्रे त्वरित सुरू करा; ॲड. जयश्री शेळके यांची सरकारकडे मागणी…

बुलढाणा …
बुलढाणा जिल्ह्यात यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असतानाही नाफेडकडून केली जाणारी खरेदी अत्यंत कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यासाठी दिलेले खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवून बंद असलेली सर्व मका खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात तब्बल ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात सुमारे २० लाख ६१ हजार ३७२ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, या प्रचंड उत्पादनाच्या तुलनेत जिल्ह्यासाठी केवळ ६० हजार क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी नोंदणी केलेली असतानाही ‘उद्दिष्ट पूर्ण झाले’ या कारणावरून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात मका शिल्लक राहिला असून त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी व्यापारी बाजारात दर पाडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. “एकीकडे सरकार हमीभावाची घोषणा करते आणि दुसरीकडे खरेदी केंद्रे बंद ठेवते, ही शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका आहे,” असा आरोप ॲड. जयश्री शेळके यांनी केला आहे.
तसेच जिल्ह्यातील अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन नाफेडचे खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवावे, बंद असलेली सर्व केंद्रे पुन्हा सुरू करावीत आणि नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल याची हमी शासनाने द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या