“कर्जमाफी म्हणजे फक्त सलाईन; शेतकऱ्यांना उभं करणारं औषध नाही!” – रविकांत तुपकर यांची सरकारवर टीका..
बुलढाणा :
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकरी नेते Ravikant Tupkar यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी असून यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
तुपकर म्हणाले की, विधानसभा निवडणुका होऊन जवळपास दीड वर्ष उलटल्यानंतर सरकारला आता शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. तेही शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असा आरोप त्यांनी केला.
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी केवळ दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादित ठेवणे अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी कर्जमाफीची मर्यादा किमान पाच लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली. तसेच कर्जमाफीसाठी कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी व निकष लावू नयेत आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला गेला, तर भविष्यात कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाय नसून ती केवळ “सलाईन” असल्याची टीकाही तुपकर यांनी केली. “या कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही,” असे ते म्हणाले.
तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांनाही न्याय मिळावा यासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.



