बुलढाणा ब्रेकिंग
दाताळा गावात भीषण पाणीटंचाई; संतप्त ग्रामस्थांचा दाताळा–जामनेर रस्त्यावर जाम आंदोलन…
संग्रामपूर तालुक्यातील दाताळा गावात गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून संतप्त ग्रामस्थांनी दाताळा–जामनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा–जामनेर रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे गावातील पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांना रोजच पाण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
गावात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरपंच व स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही दिवस ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र अपुरा पुरवठा आणि पाणी भरण्यासाठी होणारी गर्दी यामुळे गावात वारंवार भांडणे होत असल्याने तोही पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
पाण्याच्या प्रश्नामुळे महिला देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “जोपर्यंत गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम इशारा आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ दाताळा–जामनेर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



