बुलढाणा ब्रेकिंग
“फक्त 100 जणांचीच जेवण व्यवस्था…!” – कार्यशाळेत आशा स्वयंसेविकांचा अपमान; उपाशीपोटी त्रास, एकीचा हात मोडला
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत आशा स्वयंसेविकांशी अत्यंत अमानुष वागणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाच्या अपुऱ्या नियोजनामुळे शेकडो स्वयंसेविकांना उपाशी राहावे लागले, तर एका स्वयंसेविकेला चक्कर येऊन पडल्याने तिचा हात मोडल्याची गंभीर घटना घडली आहे.
सविस्तर बातमी :
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सिंदखेड राजा येथे तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सुमारे 150 आशा स्वयंसेविकांना निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी सकाळी लवकर बोलावण्यात आलेल्या या स्वयंसेविकांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात दिवसभर त्यांना कोणतीही योग्य सुविधा मिळाली नाही. भर उन्हात बसून प्रशिक्षण घेत असताना अनेक स्वयंसेविकांची तब्येत बिघडू लागली.
दुपारच्या सुमारास सर्वजणी जेवणासाठी बसल्यानंतर धक्कादायक प्रकार घडला. “इथे फक्त 100 जणांच्या जेवणाचीच व्यवस्था आहे,” असे सांगत उर्वरित स्वयंसेविकांना ताटावरून उठवण्यात आले. या घटनेमुळे संताप व्यक्त करत अनेकांनी कार्यशाळेवरच बहिष्कार टाकला.
उन्हाचा तडाखा आणि दिवसभर उपाशी राहिल्याने काही स्वयंसेविकांना चक्कर येऊ लागली. याचदरम्यान एका आशा स्वयंसेविकेला चक्कर येऊन ती खाली पडली आणि तिचा हात मोडला. संबंधित स्वयंसेविकेवर शस्त्रक्रियेची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या 100 हून अधिक आशा स्वयंसेविकांनी थेट तहसील कार्यालय गाठत निषेध व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करत निवेदन दिले.
दरम्यान, या प्रकरणी नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करत दिलगिरी व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही, याची ग्वाही दिली.
मात्र, आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विभागाकडूनच अशा प्रकारचे नियोजनशून्य व निष्काळजीपणाचे चित्र समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



