15 C
New York
Monday, October 26, 2026

Buy now

spot_img

मलकापूर येथे राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे थाटात उद्घाटन*.. *खेळाडूंनी सहभागातून कौशल्य विकसित करून क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा – जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे*

*मलकापूर येथे राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे थाटात उद्घाटन*..

*खेळाडूंनी सहभागातून कौशल्य विकसित करून क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा – जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे*

> – राज्यभरातील १४ वर्षांखालील मुले व मुलींचा स्पर्धेत सहभाग

> – २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान मलकापूर येथे रंगणार क्रीडा स्पर्धांचा थरार

> – खेळाडूंना शासकीय योजनांच्या माध्यमातून करिअरच्या संधी

बुलढाणा

खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याला प्राधान्य देत सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपले कौशल्य विकसित करावे. स्पर्धेतील सहभाग हा यशाच्या दिशेने टाकलेला पहिला महत्त्वाचा टप्पा असून, त्यातून खेळाडूंना प्राविण्य मिळविण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, मलकापूर आणि सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धा २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जनता कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे होत आहेत. उद्घाटन समारंभ नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूर येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभागाचे उपसंचालक अविनाश पुंड होते. यावेळी लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, मलकापूरचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, डॉ. अनिल खर्चे, सुधीर पाचपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी विजय पळसकर, निवड समिती सदस्य अतुल कुलकर्णी, नूतन इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या संदीप कोर, यशोधाम पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. वैभव महाजन, प्राचार्या उषा, डॉ. महेंद्र भारंबे, राजू फाटे, सुधीर चव्हाण आणि जनता कला व वाणिज्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. कैलास पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

*खेळाडूंच्या पथसंचलनाने आणि क्रीडा ज्योतीने उद्घाटन सोहळ्यात उत्साह*

कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध विभागांतील खेळाडूंनी पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू सोनल खर्चे व अन्य खेळाडूंनी प्रज्वलित केलेली क्रीडा ज्योत मान्यवरांकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्व. खाशाबा जाधव आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची माहिती दिली.

*क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी – अविनाश पुंड*

खेळाडूंना मार्गदर्शन करताना उपसंचालक अविनाश पुंड यांनी शासनाकडून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सुविधा व योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. खेळाडूंना शिष्यवृत्ती, शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी असलेले पाच टक्के आरक्षण तसेच पात्रतेनुसार थेट नियुक्तीसारख्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहावे आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी उपलब्ध क्रीडा सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन अधिकाधिक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवावे आणि आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. डॉ. अरविंद कोलते आणि प्रा. डॉ. कैलास पवार यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.

*राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग*

या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध विभागांतील १४ वर्षांखालील मुले व मुली सहभागी झाले आहेत. बॅडमिंटन आणि सॉफ्ट टेनिस या दोन्ही खेळांच्या प्रत्येक विभागातून प्रत्येकी ४० मुले व ४० मुलींचा सहभाग असून, संघ व्यवस्थापक, पंचाधिकारी, स्वयंसेवक आणि निरीक्षकही स्पर्धेच्या आयोजनात सहभागी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू सोनल खर्चे यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी, देऊळगाव राजा बी. एस. महानकर, तालुका क्रीडा अधिकारी, मलकापूर प्रशांत मंडले, उज्वला लांडगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप केळे, डॉ. जीवन मोहोड, क्रीडा मार्गदर्शक अनुराधा सोळंकी, सहायक क्रीडा विकास अधिकारी मनोज श्रीवास यांच्यासह निलेश पवार, राजूभाऊ खंगार, फुल्लल वानखडे, दिनेश राठोड, सागर इंगळे, भीमराव पवार, प्रभू वाघ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भुजबळ यांनी केले, तर तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या