*बुलढाणा ब्रेकिंग*
*पिंपळनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा! ६०.८९ लाखांचे ४७ हजार ८८५ किलो मसाले जप्त; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित…*
*मसाला उत्पादनातील अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय उघड! जनता सेवा व अनोखे फूड्सवर सण-उत्सव विशेष मोहिमेत मोठी कारवाई..*
सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे २५ ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आस्थापनांमधून तब्बल ४७ हजार ८८५ किलो मसाल्यांचा, एकूण ६० लाख ८९ हजार ६४६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
पिंपळनेर येथील मे. जनता सेवा मिरची मसाला इंडस्ट्रीज या आस्थापनेच्या तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. उत्पादन परिसरात अस्वच्छता, मांजर, कबुतरे आणि कीटकांचा वावर, कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अभाव, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव तसेच अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अन्नपदार्थांचे चाचणी अहवालही उपलब्ध नव्हते.
लेबलवरील दोषांमुळे ‘JSM’ ब्रँडचा कांदा-लसूण मसाला, तसेच कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून सुटी मिरची पावडर, हळद पावडर आणि अख्खी हळद असा एकूण ४७ हजार ३८१ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ५७ लाख ९५ हजार ८४६ रुपये आहे. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
*अनोखे फूड्स अँड स्पाइसेसवरही कारवाई..*
याच ठिकाणी मे. अनोखे फूड्स अँड स्पाइसेस या आस्थापनेचा मसाल्यांचा साठा आणि पॅकिंग साहित्य आढळून आले. या आस्थापनेला परवाना असलेल्या गट क्रमांक ८१ येथील जागेवर प्रत्यक्ष कामकाज सुरू नसताना अन्य ठिकाणी वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. तसेच अन्नपदार्थांचे चाचणी अहवाल उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले.
या कारवाईत ‘अनोखे’ ब्रँडची २३८ किलो लाल मिरची पावडर, २०८ किलो हळद पावडर आणि ५८ किलो धने पावडर असा एकूण ५०४ किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ९३ हजार ८०० रुपये आहे.
*प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई..*
ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावती विभागाचे सहआयुक्त (अन्न) एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाण्याचे सहायक आयुक्त (अन्न) प्र. शि. पाटील यांच्या निर्देशानुसार व उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी केली.
जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने मसाला उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



